कोल्हापूर : वीजेचा खांब कोसळून लाईनमनचा मृत्यू, काही दिवसांपूर्वी कोरोनाने घेतला होता वडिलांचा बळी! | पुढारी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

भोसलेवाडी-जाधववाडी रस्त्यावर विजेचे काम सुरू असताना खांब अंगावर कोसळून प्रकाश आनंदा भोसले (वय 32, रा. उचत, ता. शाहूवाडी) यांचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत करण्यात आली. कदमवाडीनजीकच्या  भोसलेवाडी-जाधववाडी रस्त्यालगतच्या खांबावर वीज वितरण कंपनीचे काम सुरू होते. सिमेंटच्या खांबावर प्रकाश भोसले चढत असताना हा खांब कोसळला. खांब त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

भोसलेवाडी-जाधववाडी रस्त्यावर पुराच्या काळात पाणी आले होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन काही खांब वाकले होते. याचे कामही सुरू करण्यात आले होते. यातच बुधवारी हा प्रकार घडला.

नातेवाईकांचा आरोप

प्रकाश भोसले हे लाईनमन असताना त्यांना खांबावर का चढविण्यात आले? असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला. सीपीआर आवारात नातेवाईक, महावितरणच्या कर्मचार्‍यांनी गर्दी केली होती.

कुटुंबाचा आधार हरपला

प्रकाश भोसले यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच कोरोनाने निधन झाले होते. सध्या घरची सगळी जबाबदारी प्रकाश यांच्यावरच होती. त्यातच त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांना मानसिक धक्‍का बसला.Source by [author_name]

Leave a Reply