महाविकास आघाडी, विरोधी भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

कोल्हापूर : प्रवीण मस्के

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ‘शिक्षक’साठी कोल्हापुरातील दिग्गज उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर ‘पदवीधर’मध्ये भाजप व राष्ट्रवादीला बंडखोरी टाळण्यात यश आले आहे. दोन्ही मतदार संघात बहुरंगी लढती होणार असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत संपली असून पदवीधरच्या 16 व शिक्षकच्या 15 उमेदवारांनी माघार घेतली. काँग्रेसकडून कोल्हापुरातून प्रा. जयंत आसगावकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ‘शिक्षक’साठी मुलाखती दिलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांची चर्चा सुरू होती. ‘कोजिमाशि’चे शिक्षक नेते दादासाहेब लाड, राज्य कृती समितीचे बाबासाहेब पाटील, राज्य कायम  विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे जि.प.सदस्य प्रा. शिवाजी मोरे, प्रा. डॉ. मानसिंगराज निंबाळकर, इचलकरंजीतील संभाजीराव खोचरे या प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. 

पालकमंत्री पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत काही दिग्गजांनी माघार घेतली आहे. परंतु, माघार घेतलेले प्रा. आसगावकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. राज्य कृती समितीचे कोल्हापूरचे बाबासाहेब पाटील यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर कृती समितीमध्ये फूट पडली असून कृती समितीचे उमेदवार व विद्यमान शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांना मोठा धक्‍का बसल्याचे मानले जात आहे. शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत सोलापूरचे जितेंद्र पवार, विद्यमान आ. दत्तात्रय सावंत (अपक्ष), ‘टीडीएफ’चे जी. के. थोरात यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या रिंगणात ‘मनसे’चे विद्यानंद मानकर (पुणे),‘वंचित’कडून सम—ाट शिंदे (सांगली), अभिजित बिचुकले (सातारा), रेखा दिनकर पाटील (पुणे) यांच्यासह ‘सुटा’चे प्रा. सुभाष जाधव, प्राचार्य. डॉ. राजेंद्र कुंभार, ‘डीसीपीएस’चे करणसिंह सरनोबत, ‘विनाअनुदानित’चे प्रा. टी. एम. नाईक, ‘टॅफनॅफ’चे नितीन पाटील असे 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

‘पदवीधर’मधून राष्ट्रवादीने अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून संग्राम देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रयत क्रांती संघटनेचे प्रा. एन. डी. चौगुले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने या प्रमुख उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारातच प्रामुख्याने लढत होण्याची शक्यता आहे. जनता दल (सेक्युलर) चे माजी आ. शरद पाटील, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, अपक्ष नीता ढमाले यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा तर कोणाला तोटा होतो, हे निकालानंतरच समजणार आहे. ‘मनसे’च्या अ‍ॅड. रुपाली पाटील-ठोंबरे, आम आदमी पार्टीचे डॉ. अमोल पवार, अखिल भारतीय हिंदू महासभेचे कपिल कोळी, संभाजी बि—गेडचे मनोजकुमार गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्यासह तब्बल 62 उमेदवार  नशीब आजमावत आहेत. 

प्रा. आसगावकरांसाठी दिग्गजांची माघार

सरसकट सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानितांंचे प्रश्‍न, प्रचलित नियमानुसार अनुदान व शैक्षणिक व शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. ‘कोजिमाशि’पतसंस्था निवडणुकीसाठी दादासाहेब लाड यांना प्रा. जयंत आसगावकर हे बिनशर्त पाठिंबा देतील, असा शब्द पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्याने कोल्हापुरातून दिग्गजांनी उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पालकमंत्री दिलेला शब्द पाळणार का? याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष असणार आहे. Source by [author_name]

Leave a Reply